Uddhav Thackeray Meets Sharad Pawar | राजकीय-सामाजिक घडामोडींवर उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा

मुंबई : Uddhav Thackeray Meets Sharad Pawar | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी स्वबळाचा दावा केला होता. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ५० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत बिघाडी झाली का?, महाविकास आघाडी पुढे टिकणार का?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच, सत्ताधारी पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मेळाव्यांचेही आयोजन केले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत साधारणपणे दीड तास चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत व आमदार आदित्य ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, २५ जानेवारी रोजी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींला कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या जन आक्रोश मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता आणि त्या दृष्टिकोनातून पुढील पावलं नेमकी काय उचलायची? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रणनीती काय असेल?, यासाठी लवकरच महाविकास आघाडीची राज्यस्तरीय महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुद्धा होऊ शकते.