Beed News | एचआयव्ही मुळं 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा, गावानं कुटूंबाला टाकलं वाळीत, डॉक्टरसह पोलिसांवर गंभीर आरोप

बीड : Beed News | एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याने गावाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीड मधून समोर आला आहे. ही अफवा पसरवण्यामागे आरोग्य विभागातील अधिकारी आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. याबाबत या कुटुंबाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

आष्टीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप माध्यमांना ऐकवली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने आमच्या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याचे सांगितल्याचे म्हटले आहे. तसेच तिच्या मृत्यूनंतर तिच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकांची तपासणी करुन घ्या अशी भीतीही दाखवली, असा आरोपही कुटुंबाने केला आहे.

२३ वर्षीय मुलीचा सासरी १३ तारखेला मृत्यू झाला, त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह आष्टीच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आला. तिला एचआयव्हीची लागणही झालेली नव्हती. पण तिच्या सासरच्या लोकांनी डॉक्टरांना आणि पोलिसांना तसे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी आणि पोलिसांनी आमच्या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याने तसेच ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली.

तसेच मुलीला हा आजार झालेला असल्यामुळे तुम्ही देखील आपली चाचणी करुन घ्यावी, असा सल्ला त्यांना देण्यात आला. तसंच अत्यंसंस्काराला जे कोणी नातेवाईक येतील त्यांना दूर राहायला सांगा, असे आम्हाला सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

याबाबतची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील लोकांनी या कुटुंबाला वाळीत टाकले, त्यांच्याशी बोलणं बंद केले. या कुटुंबांचे नातेवाईकही मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर या कुटुंबाकडे फिरकलेले नाहीत. याची तक्रार या पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी आणि पोलीस आधीक्षकांकडे केली आहे.