Shivsena Shinde Group On Shivsena UBT | शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक भाष्य; म्हणाले – ‘पुढच्या 8 दिवसात ठाकरे गटातून…’

CM Eknath Shinde Uddhav Thackeray

मुंबई : Shivsena Shinde Group On Shivsena UBT | काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे, असे विधान करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानावर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य केले आहे. “ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसात शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे “, असे विधान सामंत यांनी केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, ” भास्कर जाधव असे म्हणाले होते की, शिवसेना ठाकरे गटाची काँग्रेस झाली. त्यांच्या या विधानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी असे म्हटले की, शिवसेना ठाकरे गटाची ३ वर्षांपूर्वीच काँग्रेस झाली आहे. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जपत आहोत. भास्कर जाधव यांची सध्या कुचंबना होत असेल. आमची अशीच कुचंबना तीन वर्षांपूर्वी झाली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता. त्या अनुषंगाने मी असे म्हटलं की जर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले तर आमच्यासाठी फायद्याचे असेल. “

ते पुढे म्हणाले, ” १८ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर आहेत. मी १९ तारखेला दावोस दौऱ्यावर जाणार आहे. २४ तारखेला दावोस वरून पुन्हा येणार आहे. त्यामुळे २४ तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला असा शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसात शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे. मी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ज्या प्रकारे बदलली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटते की आम्हीच बरोबर होतो. त्यामुळे आता ठाकरे गटाचे लोक आमच्याकडे येत आहेत”, असे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.