Ajit Pawar NCP | पिंपरी चिंचवड: बालेकिल्ला काबीज करण्यासाठी अजित पवारांची खेळी, लांडे-गव्हाणेंची घरवापसी होणार?

Ajit Pawar Pink

पिंपरी : Ajit Pawar NCP | विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्क्यावर धक्के दिले होते. आता मात्र अजित पवार याची परतफेड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी स्वतःचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी आता पत्ते खुले करायला सुरुवात केली आहे. भोसरी विधानसभेतून याची सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी (Vilas Lande) आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचे स्वतःच जाहीर केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Pimpri Chinchwad Politics News)

दरम्यान आता भोसरी विधानसभेवेळी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अजित गव्हाणे हे २० माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत. या संदर्भात अजित पवार आणि अजित गव्हाणे यांची चर्चा झाल्याचा दावा विलास लांडे यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना विलास लांडे म्हणाले, ” अजित गव्हाणे यांनी जेव्हा तो निर्णय घेतला, तेव्हा सकाळी अजित पवार यांच्यासोबत मीटिंग झाली आणि संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत मीटिंग झाली. शरद पवार यांच्या मिटींगला मी नव्हतो. मी सांगितले की दोन्ही नेते आपले आहेत. परंतु विश्वास पात्र राहील असे काम करा. कायमच बदनामी विलास लांडे यांची होते. आपल्याला या शहरांमध्ये कोणी ताकद दिली तर ती अजित पवारांनी दिली आहे.

शरद पवार यांना माझ्या वडिलांनी देवघरात ठेवलेले आहे. एक मोठा नेता, एक आपला बहुजन समाजाचा मोठा माणूस आणि त्यांची पूजा मी करतो. त्यांचे स्थान आमच्या मनात आहे. पण या शहरातल्या विकासाला अजित पवार यांनी गती दिली. महानगरपालिकेमध्ये १९९२ पासून अजित पवार यांनी लक्ष दिले. तेव्हापासून या शहराचा चेहरा-मोहरा बदलला गेला आणि त्याचे श्रेय फक्त अजित पवार यांना आहे. “

विलास लांडे यांनी हे वक्तव्य करत महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे याद्वारे त्यांनी सुचित केले आहे. अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटात दिसतील का? यावर बोलताना ते पुढे म्हणाले, ” अजित पवारांचा फोन आल्याबाबत मला अजित गव्हाणे यांनी सांगितले. पक्षासाठी काम केलेल्यांना पुन्हा एकत्र घ्या. त्यांना वाऱ्यावर सोडू नका असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित गव्हाणे यांनी त्यांच्या २० नगरसेवकांसोबत चर्चा करून अजित पवारांसोबत जावे असे मला वाटत आहे. अजित गव्हाणे देखील इकडे येण्याची शक्यता आहे”, असे विलास लांडे यांनी म्हंटले आहे.