Bike Taxis News | पुणे: रिक्षा संघटनांच्या विरोधानंतरही शहरात बाईक टॅक्सी सुरु होणार, शासनाने बनविला कायदा

पुणे : Bike Taxis News | मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई, पुण्यासारख्या शहरात बाईक टॅक्सीसेवा काही कंपन्यांनी सुरु केली होती. परंतू, हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. त्याबाबत आंदोलनेही करण्यात आली होती. त्यानंतर परिवहन विभागाने यावर कारवाई करत या कंपन्यांची दुचाकी टॅक्सी सेवा बंद केली होती. मात्र आता ही सेवा पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारने ओला, उबर प्रमाणेच बाईक टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी मसुदा तयार केला आहे.
महाराष्ट्र ॲग्रीगेटर रेग्युलेशन २०२४ असे या मसुद्याचे नाव असून मोटर वाहन विभागाने हा मसुदा मंगळवार (दि.१४) मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडला. परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला दुजोरा दिला आहे. ही नियमावली प्रवाशांच्या सुरक्षेला प्राथमिकता देऊन तयार केल्याचे सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यात तो लागू केला जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
बाईक टॅक्सीमुळे नवा रोजगार निर्माण होणार आहे. याद्वारे महिलांनाही रोजगार मिळू शकतो. ड्रायव्हर आणि पॅसेंजर यांच्यातील सुरक्षेसाठी दोन सीटच्या मध्ये पुरेशी जागा सोडण्यासाठी स्टँड लावण्याचा विचार देखील आहे. याचा फायदा महिलांना होणार आहे.
बाईक टॅक्सी विलंबाने आल्यावर दंड आकारला जाणार आहे. त्यामध्ये ॲप आधारित चारचाकी किंवा दुचाकी टॅक्सी बोलविल्यानंतर ती १० मिनिटात आली नाही तर चालकाला १०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तो दंड प्रवाशाला दिला जाणार आहे. तसेच एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉस्पिटलसाठी केलेले बुकिंग रद्द केल्यास टॅक्सी चालकाला पाचपट रक्कम दंड म्हणून आकारला जाणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी या नियमावलीचे प्रस्तुतीकरण केले आहे.