Walmik Karad News | वाल्मिक कराडला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी? सीआयडी आज न्यायालयात करु शकते अर्ज

पुणे : Walmik Karad News | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Santosh Deshmukh) यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराड यानेच धमकीचे फोन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला सहआरोपी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याची १४ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्याला केज न्यायालयात (Kaij Court) हजर केल्यानंतर पोलिसांच्या वतीने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला सहआरोपी करुन त्याची हत्या प्रकरणात ताब्यात देण्याची मागणी केली जाऊ शकते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला वर्ग केल्यावर या गुन्ह्यातील इतर आरोपींवर मोका कारवाई झाली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचाही त्याच मोका कारवाईत समावेश होईल.
सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी पुरवणी जबाबात म्हटले आहे. हत्येच्या एक महिना आधी संतोष देशमुख यांना धमकी देण्यात आलेली होती. जीवे मारण्याची धमकी आल्याने संतोष हे अस्वस्थ होते. नोव्हेबर महिन्यातच त्यांना ही धमकी आलेली होती. विष्णु चाटे आणि वाल्मिक कराड याने धमकी दिली होती, असे या जबाबात म्हटले आहे. सीआयडीने (Pune CID) वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड याच्यात मोबाईलवर संभाषण झाले असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराड याचा सहभाग आढळून येत आहे. वाल्मिक कराड याला सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात वर्ग करुन घेण्यासाठी आवश्यक पुरावे सीआयडीच्या हाती लागले असल्यानेच सीआयडीने अश्विनी देशमुख यांचा पुरवणी जबाब नोंदविला असल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी बीडचे पोलीस अधीक्षक (Beed SP) नवनीत कॉंवत (Navneet Kanwat IPS) आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन करुन तपासाची सर्व माहिती देशमुख कुंटुबियांना द्यावी अशा सूचना दिल्याचे सांगण्यात येते. तपासामध्ये कोणालाही दयामाया दाखवू नका. संतोष देशमुख प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे वाल्मिक कराड याला केज न्यायालयात हजर केल्यानंतर सीआयडीकडून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वर्ग करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. जर सीआयडीने अशी मागणी केली नाही तर वाल्मिक कराड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी लागणार आहे.
जर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला वर्ग करुन घेण्यात आले नाही आणि तो न्यायालयीन कोठडीत गेला तर मराठा समाजात वेगळा मेसेज जाईल, हे लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी एकही आरोपी सुटता कामा नये, अशी सूचना केली असल्याचे बोलले जाते. वाल्मिक कराड याला हत्याप्रकरणात अटक करावी व मोका लावावा, अशी देशमुख कुटुंबिय आणि मराठा समाजाची (Maratha Samaj) प्रमुख मागणी आहे. तपासाची सर्व माहिती देशमुख कुटुंबियांना द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आज सीआयडीचे पोलीस अधिकारी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तपासाची माहिती देणार आहे. या भेटीत त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करुन कारवाई केल्याची माहिती दिली जाऊ शकते.