Sharad Pawar On Civic Body Elections Maha | ‘आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झालीच नव्हती’, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचे भाष्य, स्वबळावर निवडणुका लढण्याबाबत दिले स्पष्ट संकेत

Sharad-Pawar (6)

मुंबई : Sharad Pawar On Civic Body Elections Maha | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील तिन्ही मुख्य पक्ष मविआ म्हणून निवडणूक लढणार की स्वबळाचा नारा देणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत मविआला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा सूर ऐकायला मिळत आहे. संजय राऊत यांनी त्याबाबत भाष्य केले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे”, असे संजय राऊत यांनी म्हंटले होते.

त्यानंतर आता शरद पवार यांनीही आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, ” इंडिया आघाडीत आम्ही सर्व एकत्र बसलो तेव्हा आमच्याकडे जेव्हा निवडणुका होत्या. त्यात एकत्र येण्याचा विचार होता. राज्यातील आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावं अशी चर्चा कधीही झाली नाही. इंडिया आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झालीच नव्हती. राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा या आघाडीत होत होत्या.

महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या भूमिकेबाबत खुलासा केला आहे का, ते माहिती नाही. परंतु, एक स्वच्छ सांगतो की, आता बारामती आणि इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तिथे आम्ही आघाडीचा विचार केला नाही. करणार नाही. असे असले तरी आता येत्या ८ ते १० दिवसात आम्ही एक बैठक घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बाहेर आहेत, ते परत आले की, संघटनात्मक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.