Palghar Crime News | उपाशीपोटी गड चढला, दर्शन घेऊन उतरताना उलटी झाली अन् क्षणातच तरुणाचा मृत्यू

पालघर : Palghar Crime News | ट्रेकिंगचे आवड असेल, मात्र सवय नसेल तर ते जीवावर बेतू शकते. असाच प्रकार पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडला आहे. डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन उतरताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिलन डोंबरे (वय-३५) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून मिलन आपल्या पत्नी,भाऊ आणि इतर कुटुंबीयांसह महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी (Dahanu Mahalaxmi Fort) उंच असलेल्या गडावर जाताना मिलन हा गडावर हजार पायऱ्या सहजच चढला. मात्र उतरताना त्याला अचानक उलटी झाली आणि काही क्षणातच त्याचा तिथेच मृत्यू झाला. मिलनच्या कुटुंबीयांनी त्याला खांद्यावर घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र तोपर्यंत मिलनचा मृत्यू झाला होता. देवीच्या दर्शनाला आनंदात गेलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोटात अन्न नसताना अति उंचावर चालल्याने मिलनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान सवय नसेल तर अचानक ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सने जाऊ नये असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. अशाच ट्रेकिंगच्या आवडीतून मिलनला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे ट्रेकिंग करताना आधी शरीराची थोडीफार कसरत करून नंतरच ट्रेकिंग करा, असे आवाहन करण्यात आले आहे.