Nashik Crime News | दुर्दैवी ! 4 महिन्यांवर लग्न, संक्रांतीच्या सुट्टीत भावाकडं आला, नायलॉन मांजाने तरुणाच्या आयुष्याचा दोर कापला

नाशिक : Nashik Crime News | नायलॉन मांजामुळे अवघ्या २३ व्या वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. सोनू धोत्रे (वय-२३) असे तरुणाचे नाव आहे. गुजरातमधील वलसाड येथून तो सणासाठी नाशकात आलेला, पण नायलॉन मांजामुळे त्याचा मृत्यू झाला. सोनू धोत्रे याचे ५ महिन्यानंतर लग्न होणार होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू धोत्रे लहान असतानाच आई आणि वडिलांचे निधन झाले. त्याला एक मोठा भाऊ आहे, तो नाशिकमध्ये नोकरीला आहे. सोनू धोत्रे गुजरातच्या वलसाडमध्ये महापालिकेच्या गाडीवर चालक म्हणून कामावर आहे. संक्रांतीच्या सुट्टीत तो भावाकडे गुजरातवरून नाशिकमध्ये आला होता. सोनू धोत्रे २० मे रोजी विवाह बंधनात अडकणार होता.
बुलढाण्यातील चिखली येथील मुलीसोबत आयुष्याची स्वप्न पाहत होता. मात्र नाशिकमधील पाथर्डी फाटा येथून देवळाली कॅम्पकडे जात असताना नायलॉन मांजामुळे त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवरून सोनू जात होता, त्यावेळी नायलॉन मांजामुळे फास लागला अन् गळा चिरला गेला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.