Turbhe MIDC Accident News | दोघी मैत्रिणी BPO मधील रात्रीची शिफ्ट संपवून घरी निघाल्या, मात्र वाटेतच काळाचा घाला, स्कोडा कारच्या धडकेत दोन तरुणींनी गमावला जीव

मुंबई : Turbhe MIDC Accident News | पाम बीच रोडवर (Palm Beach Road Navi Mumbai) रविवार (दि.१२) भरधाव स्कोडा कारने स्कूटरला दिलेल्या धडकेत दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संस्कृती खोकले (वय-२२) आणि अंजली सुधाकर पांडे (वय-१९) अशी मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. तुर्भे एमआयडीसीतील रात्रीची शिफ्ट संपवून त्या घरी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे येथील बीपीओमध्ये संस्कृती आणि अंजली दोघी काम करायच्या. त्या रात्री ८ ते सकाळी साडे सहा या वेळेत अमेरिकेतील कंपनीसाठी टेलिकॉलर म्हणून काम करत होत्या. संस्कृतीकडे यामाहा फॅसिनो स्कूटर होती. ती रोज कामोठे ते कामाच्या ठिकाणी याच स्कूटीने जायची. सकाळी काम उरकल्यानंतर ती आधी अंजलीला सोडायची, मग घरी जायची. रविवार (दि.१२) सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास दोघीही ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर त्या घराकडे निघाल्या.
संस्कृती कोपरा पुलाजवळील सर्व्हिस रोडने पाम बीच रस्त्यावर आली तिथे वाशीच्या अरंजा सर्कल येथे ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच संस्कृतीचा मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान अंजलीचाही मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्कोडा कारचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी स्कोडा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती एपीएमसी पोलिस स्टेशनचे (APMC Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे (Sr PI Ajay Shinde) यांनी दिली आहे.