Shivane Pune Crime News | पुणे: ‘मी इथला दादा, हप्ता दिला नाही तर दुकान आणि कंपनी जाळून टाकेन’ ! सराईत गुन्हेगाराने शिवणेत माजवली दहशत, लॉन्ड्रीत मोडतोड करुन कारची फोडली काच

पुणे : Shivane Pune Crime News | मी इथला दादा आहे. मी पोलिसांना घाबरत नाही. मला घर बांधायचे आहे. दर महिन्याला हप्ता दिला पाहिजे, नाही दुकान जाळून टाकीन, असे म्हणून गुंडाने लॉन्ड्रीच्या दुकानात तोडफोड केली. तसेच शिवणेतील पाटीलनगरमधील कंपनीच्या मालकाच्या चारचाकीची काच फोडून कंपनी जाळून टाकण्याची धमकी दिली.

याबाबत राम चिंदु उत्तेकर (वय ५५, रा. सूर्या कंन्स्ट्रक्शन, दांगट इंडस्ट्रियल, शिवणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओंकार ऊर्फ खंड्या वाघमारे Omkar Alias Khandya Waghmare (वय २१, रा. दत्तनगर, रामनगर, वारजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिवणे येथील दांगट इंडस्ट्रियल मधील इन्डस कंपनी आणि समर्थ ड्रायक्लीनर्स येथे १० जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची समर्थ ड्रायक्लीनर्स नावाची लॉन्ड्री आहे. ते दुकानात असताना ओंकार वाघमारे हा हातात लोखंडी रॉड घेऊन दुकानात आला. मी या भागातील दादा असून मला घर बांधायचे आहे. त्याकरीता तू मला आताच्या आता १० हजार रुपये दे, तसेच दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता देशील. नाही तर मी तुझे डोके रॉडने फोडून टाकीन व तुझे दुकान जाळून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे राम उत्तेकर यांनी घाबरुन थोडे फार पैसे आहेत ते देतो, असे म्हणताच वाघमारे याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन इस्त्रीच्या टेबलची तोडफोड करुन कपडे अस्थाव्यस्थ फेकून देऊन आरडाओरडा केला.

त्यानंतर त्याने इन्डस कंपनीसमोर जाऊन मी इथला दादा आहे. त्यामुळे इथल्या कंपनीतील लोकांनी मला दर महिन्याला हप्ता द्या, नाही तर मी तुमची दुकाने जाळून टाकीन. तसेच इन्डस कंपनीचे मालक हे त्यांच्या कंपनीच्या बाहेर थांबलेले असताना वाघमारे याने त्यांनाही मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या चारचाकी कारची काच फोडून नुकसान केले.

वाघमारे याने मी या भागातील दादा असून मला दर महिन्याला हप्ता दिलाच पाहिजे. नाही तर तुझी कंपनी पेटवून देईल, असे मोठमोठ्याने आरडाओरडा करुन धमकी दिली. मी पोलिसांना घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत रोडने परिसरात फिरुन दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करीत आहेत.