Raigad Accident News | भरधाव वाहनाने रिक्षाला दिलेल्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू; रिक्षाचालक गंभीर जखमी

रायगड : Raigad Accident News | पाली खोपोली राज्य महामार्गावर (Pali Khopoli Highway) दुरशेत गावानजीक भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवार (दि.११) पहाटे चार वाजताच्या सुमारास घडला. रामदास ज्ञानेश्वर घोगरकर,अजित हरिचंद्र वाघमारे (रा- घोडपापड ता. सुधागड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा खोपोली बाजूकडून जांभूळपाडा घोडपापड या बाजूला जात होती. यावेळी अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला. पोलिसांनी अपघाताचा योग्य तो तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
अखिल भारतीय आदिवासी सामाजिक विकास संस्थेचे कोकण संघटक रमेश पवार यांनी सांगितले की, पाली खोपोली महामार्गावर झालेल्या रिक्षा अपघातात दोन कुटुंबातील कर्त्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाती रिक्षाची अवस्था पाहता कोणत्यातरी वेगवान अज्ञात वाहनाने पहाटेच्या अंधारात रिक्षाला धडक दिली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, तरी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी नेमकी वस्तुस्थिती काय ती समोर आणावी, अशी मागणी रमेश पवार यांनी केली आहे.