Pune Crime Branch News | बदला घेण्यासाठी बाळगले पिस्टल; मध्यस्थासह दोघांना अटक, एक पिस्टल व एक काडतुस जप्त

पुणे : Pune Crime Branch News | जमिनीच्या वादातून चुलत मामाने धमकी दिल्याने तरुणाने बदला घेण्यासाठी पिस्टल बाळगले होते. ही बाबत गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला समजल्यानंतर त्यांनी या तरुणासह ज्याच्या मध्यस्थीने हे पिस्टल विकत घेतले होते, त्या मध्यस्थालाही अटक केली आहे. (Pistol Seized )
आकाश बळीराम बिडकर Akash Baliram Bidkar (वय २४, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, नवश्या मारुतीजवळ, दत्तवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक काडतुस असा ४० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
तसेच सुभाष बाळु मरगळे Subhash Balu Margale (वय २४, रा. मरगळे हाऊस, जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे मध्यस्थाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की, एका तरुणाकडे पिस्टल असून तो एरंडवणा येथील डी पी रोडवरील बसस्टॉपसमोर थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन आकाश बिडकर याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस जप्त केले. आकाश बिडकर याचा चुलत मामा याच्याबरोबर जमिनीच्या कारणावरुन वाद आहे. त्याने आकाश बिडकर याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने बदला घेण्यासाठी सुभाष मरगळे याच्या मध्यस्थीने हडपसरमधील एकाकडून पिस्टल विकत घेतले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पिस्टल विकणार्याचा शोध सुरु आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजीव कळंबे, सुजित पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांनी केली आहे.