Nandurbar Navapur Crime News | हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह, 4 दिवसांपासून होता बेपत्ता

नंदुरबार : Nandurbar Navapur Crime News | नवापूर- धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील ३० ते ३५ फूट खोल दरीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सईद चिराग शाह (वय-३२, विसरवाडी, नंदुरबार) याचा हा मृतदेह असल्याचे त्याच्या मृतदेहाचा फोटो वरून निष्पन्न झाले आहे. मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह असून या तरुणाचा निर्दयतेने खून करून दरीत फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सईद शाह हा ८ जानेवारीपासून बेपत्ता होता. या प्रकरणी कुटुंबीयांनी साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्री पोलिसांना ११ जानेवारीला कोंडाईबारी घाटात हनुमान मंदिराजवळील वळणावरून खाली दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. कोंडाईबारीच्या घाटात मृतदेह ३० ते ३५ फूट खोल झुडपांमध्ये आढळून आला. मृताच्या तोंडावर कापड, तर हात-पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत होता.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या तरुणाचा खून करून त्याला चार दिवसांपूर्वीच फेकून दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे.