Pune Crime News | फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | फर्ग्युसन रस्ता परिसरातील (FC Road Pune) पदपथावर बेकायदा असलेल्या पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागातील (PMC Anti Encroachment Department) पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवार (दि.६) सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. यावेळी हा प्रकार घडला. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सचिन घेंगे (वय- २९, रा- मांजरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथावर बेकायदा पथारी थाटण्यात आल्या आहेत. या भागात फेरीवाल्यांकडून बेकायदा व्यवसाय केला जातो. पादचाऱ्यांना पदपथावरुन चालता देखील येत नसल्याने महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदा पथारी व्यावसायिक फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली.

सोमवार (दि.६) फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी महिलेसह चौघांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.