Bla Bla Car App | ब्ला ब्ला कार ॲप पुणे आरटीओच्या रडारवर, पिकअप पॉईंट शोधून कारवाई होणार

Zoomcar (1)

पुणे : Bla Bla Car App | मुंबई-पुणे प्रवासाठी ब्ला ब्ला ॲपचा वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ॲपद्वारे अवैध प्रवास वाहतूक केली जात असून हे ॲप आणि कार चालक आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

एकट्यासाठी चारचाकी वाहन काढून मुंबई- पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्ला ब्ला ॲपने उपलब्ध करून दिली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती. त्यातच पैशांची, इंधनाची बचत अशा कारणांमुळे अगदी कमी वेळेत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झाले.

मात्र आता याबाबत आरटीओने एक नवा आदेश जाहीर केला आहे. त्यामध्ये ब्ला ब्ला कारचे पिकअप पॉईंट शोधून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यासाठी अगदी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

कारवाई करण्यासाठी रस्ता सुरक्षा पथकाला पुण्यातील नवले पूल, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन यासारख्या आणखी काही ठिकाणी पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ॲप सारख्या इतर ॲपद्वारे बुकिंग केलेल्या खाजगी वाहनांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. या वाहनांवर आता ई-चलनद्वारे कारवाई होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना असिस्टंट रिजिनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर विनायक साखरे म्हणाले, ” ब्ला ब्ला ॲप आणि इतर अशा ॲपद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. ही वाहतूक अवैध आहे. वाहतूक पोलिसांना या ॲपचे पिकअप पाईंट शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ब्ला ब्ला ॲप तसेच तत्सम ॲपविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.”