Raj Thackery On Municipal Elections | ‘विधानसभेला जे झालं ते विसरून महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा’, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Raj-Thackeray

मुंबई : Raj Thackery On Municipal Elections | लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महत्वाच्या मतदारसंघात सभाही घेतल्या. परंतु, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यानंतर आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मनसैनिकांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनसेच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे अद्यापही समोर आलेले नाहीत. मनसेकडून पराभवाचे चिंतन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यातच आता विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरून पुढे जात आता महापालिका निवडणुकीत कंबर कसून तयारीला लागण्याचा पवित्रा मनसेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी विविध बाबींचा आढावा घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले असून, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ” विधानसभा निवडणुका झाल्या. आता महापालिका निवडणुका आहेत. त्याला कशा प्रकारे सामोरे जायचे, यासाठी मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.