Pune Crime News | अभ्युदय बँकेच्या लॉकरमधून साडेतेरा लाखांच्या दागिन्यांची चोरी; कोणीही लॉकर उघडल्याची नोंद नसताना दागिने झाले लंपास

पुणे : अभ्युदय बँकेच्या (Abhyudaya Co-operative Bank Ltd) नाना पेठेतील शाखेमध्ये लॉकरमध्ये ठेवलेले १३ लाख ५९ हजार ४०१ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून नेमकी चोरी झाली कशी याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत बिबवेवाडी येथे राहणार्या एका ६५ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० मार्च ते १५ मे २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या वहिनीच्या नावावर अभ्युदय बँकेच्या नाना पेठ शाखेमध्ये लॉकर आहे. या लॉकरमध्ये त्यांनी १३ लाख ५९ हजार ४०१ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने ठेवले होते. लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी प्रथम बँकेकडे केली होती. परंतु, या काळात त्यांचा लॉकर उघडले गेल्याची कोणतीही नोंद बँकेच्या रजिस्टरमध्ये नाही. त्यामुळे लॉकरमध्ये दागिने ठेवले होते का? जर ठेवले असतील तर हे दागिने कोणी चोरुन नेले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी अभ्युदय बँकेला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक जे आर फडतरे तपास करीत आहेत.