Pune Crime Court News | गणेशोत्सवात वर्गणीवरून वाद, बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार, आरोपीला कोर्टाकडून 5 लाख रुपये दंड आाणि 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : Pune Crime Court News | गणेशोत्सवातील वर्गणी गोळा करणाऱ्या दोघांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव (Judge P.P. Jadhav) यांनी एकाला दोषी ठरवून पाच लाख रुपयांचा दंड, तसेच १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. जीवन सुरेश पवार Jeevan Suresh Pawar (वय-२०, रा-भिकोबा मोरे चाळ, सदगुरू कृपा हाईट्स, उत्तमनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत रामचंद्र मोरे (वय-४४, प्रचिती अपार्टमेंट, कीर्ती नगर, वडगाव बुद्रुक) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद दिली होती. याप्रकरणी आरोपी जीवन पवार, तसेच त्याच्या अल्पवयीन भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवणे परिसरात १ सप्टेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती.
मोरे हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवणे परिसरात मोरे यांच्याकडून गृहप्रकल्प बांधणीचे काम सुरू होते. या भागातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोरे यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी आले होते. वर्गणीवरुन मोरे आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. झालेल्या या वादात आरोपींनी मोरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले, तसेच त्यांना दगडाने मारहाण केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाले होते.
या खटल्यात सरकारी पक्षाकडून ऍड. नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. उत्तम नगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खांदरे, पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे, सहायक पोलिस निरीक्षक चवरे, हवालदार विनायक करंजावणे, प्रियांका रासकर यांनी खटल्याच्या कामकाजात सहाय्य केले. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी जीवन पवारला दोषी ठरवून ५ लाख रुपये दंड आाणि १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.