Suresh Dhas | गँगस्टर निलेश घायवळशी सुरेश धस यांचे संबंध?; फोटो व्हायरल झाल्यावर आमदार धस यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले,…

Suresh Dhas

मुंबई : Suresh Dhas | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर (Santosh Deshmukh Murder Case) आवाज उठविणारे भाजप आमदार सुरेश धस यांचे गँगस्टर निलेश घायवळसोबतचे (Nilesh Ghaiwal) फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून आमदार सुरेश धस हे अडचणीत आले आहेत. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धस यांनी आरोपी वाल्मिक कराडच्या अटकेसाठी सरकारवर दबाव आणला होता. तसेच जिल्ह्यातील गुंडाराज वाढल्याने त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा मागितला होता. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर धस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले,” निलेश घायवळ यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले म्हणजे त्याच्याशी आपला काही संबंध आहे, असे नाही. त्याचे इतर लोकांसोबतही फोटो आहेत. कराड गँगचा त्रास बीड जिल्ह्यातील वंजारा समाजातील मुकादमांना देखील झाला आहे. कारखान्यांकडून खंडणीच्या टक्केवारीने सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना त्रास दिला आहे. त्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुद्धा आहेत, त्याच्याविरुद्धात काही पुरावे असून ते लवकरच सादर करू.”

ते पुढे म्हणाले, ” माझे जे फोटो व्हायरल झालेत, त्याचा आणि माझा कोणताच संबंध नाही. सर्व खोटं आहे. ज्या गँगस्टर निलेश घायवळशी फोटो व्हायरल झालेत त्याचा आणि माझा काही संबंध नाही. माझे दोन्ही मोबाईल तपासा त्यात जर घायवळशी माझा कॉल झाला असेल तर माझा आणि त्याचा काही संबंध आहे, असं म्हणा.

घायवळ याचे फोटो राम शिंदे यांच्यासोबतचे सुद्धा आहेत. वर्षा बंगल्यावरील सुद्धा आहेत. इतकेच काय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा त्याचे फोटो आहेत. माझ्या मतदारसंघातील एका व्यक्तीच्या लग्नात आला होता. त्याने फोटो काढण्याचा आग्रह केला, त्यामुळे आपण त्याच्यासोबत फोटो काढला. मी क्लिअर कट सांगतो, माझा मोबाईल चेक करा. त्यातून एकही कॉल त्याला गेला असेल तर मी त्याला जबाबदार आहे”, असे सुरेश धस यांनी म्हंटले आहे.

बीड परळीतील गुंडगिरी विरोधात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस चक्क गँगस्टरसोबत कसे फिरतात? पवनचक्की खंडणीतील मध्यस्थी बिक्कड आणि घायवळ यांच्यातील वादाचे नेमकं कारण काय? पवनचक्की ठेकेदार नितीन बिक्कडला घायवळ गँगने धमकी का दिली होती? असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. त्याच बिक्कड वर धस यांच्याकडून खंडणी डिलिंगचे आरोप झाले होते.