Shahada Nandurbar Crime News | आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने चाकूने हल्ला करीत तरुणीचा खून, शहरात तणावाचे वातावरण

नंदुरबार : Shahada Nandurbar Crime News | आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना दि. २९ डिसेंबर रोजी शहादा शहरातील मलोणीत घडली होती. त्यानंतर युवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला आहे. दिपाली सागर चित्ते (वय-२३) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२ ,३ (५) प्रमाणे मुस्लीम हमीद कुरेशी, रिज्जु मुस्लीम कुरेशी, विधी संघर्ष बालिका (सर्व.रा अक्सा पार्क समोर मलोणी ता. शहादा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरा नजीक असलेल्या मलोणी भागात २९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास दिपाली चित्ते व रिज्जु कुरेशी यांच्यात किरकोळ वाद होऊन शिवीगाळ झाली. याचा जाब विचारण्यासाठी दिपाली व तिचे नातेवाईक गेले असताना तेथे रिज्जूचा पती मुस्लिम हमीद कुरेशी याने रागाच्या भरात दिपालीवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिपालीला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती बिघडल्याने (दि.३) तिला सुरत येथील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान (दि.५) उपचारादरम्यान दिपालीचा मृत्यू झाला.

तरुणीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शहादा शहर सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आले. शहरात तणावाचे वातावरण आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.