Pune News | ड्रेनेज लाईन तुंबल्याने अनेकांच्या घरात सांडपाणी, भवानी पेठेतील नागरिक संतापले

पुणे : Pune News | भवानी पेठेतील कल्याणकर गिरणी शेजारी ३११ कासेवाडी येथे ड्रेनेज लाईन तुंबल्याने मैला पाणी थेट गल्लीबोळातून घरात शिरत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. घरात, दारात, देवघरात, स्वयंपाक घरात सगळीकडेच सांडपाणीच सांडपाणी शिरल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. कुठं झोपाव, कुठे अन्न शिजवावं, कुठ बसावं अशी एकूणच परिस्थिती ओढवल्याने कासेवाडीतील रहिवाशांची मनस्थिती संतापजनक झाली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून हा त्रास अधून-मधून होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी तर सलग चार ते पाच दिवस घरात ड्रेनेजचा साठलेला गाळ व दुर्गंधीयुक्त मैलापाणी वहिवाट असलेल्या गल्लीबोळातून थेट घरात शिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान प्रभागातील चारही माजी प्रतिनिधी व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून ही आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे बादशाह शेख, कृष्णा आरने, आदित्य कांबळे, मीरा अंकुश वाघमारे, द्वारका खिलारे, लक्ष्मी प्रकाश पवार, खाजा शेख, शब्बीर शेख, मेहताब शेख, कैलास पवार, मनीषा फुलवरे, अंजू आरणे यांनी तक्रार करत संतापजनक प्रतिक्रिया दिल्या.
रहिवासी शबाना अन्सारी म्हणाल्या, “दुर्गंधीयुक्त पाणी शिरल्याने डास मच्छरांचा उच्छाद वाढलेला असून लहान-मोठ्या आळ्या, किडे घरात येत असतात. यामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. कुठे बसून स्वयंपाक करावा, कुठे झोपावे कसं राहावं हा सर्वात मोठा प्रश्न उभा आहे. माझ्या शेजारी असलेल्या अनेकांच्या घरात तर अन्न शिजलेच नाही. अशा परिस्थितीत मुलांना शाळांना पाठवू शकत नाही. तक्रार करण्यासाठी सर्व नगरसेवक व मनपाचे उंबरठे चढून आता आमचे पाय झिजले आहेत. प्रत्येकजण फक्त पाहणी करून जात आहे.”
यावेळी संदीप आरने म्हणाले, ” कधी काळी मनपाचे कर्मचारी हे ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यासाठी येत असतात. मात्र प्रत्येकाकडून १० ते २० रुपये गोळा करून काम केल्याचे भासवून अर्धवट काम सोडून निघून जातात.”
यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे मनपा सहा आयुक्त किसन दगडखैर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले , “याठिकाणी आम्ही हाय लेवलच्या मशिनरींचा वापर केला मात्र गाळ पाणी पुढे सरकत नाही. ड्रेनेजमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात अडकल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. “