Pune Airport News | दाट धुक्यामुळे विमान सेवेला फटका, पुण्यातून जाणारी 32 विमाने लेट, प्रवाशांना मनस्ताप

पुणे : Pune Airport News | दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होताना दिसत आहे. यामुळे अनेक विमानांना उशीर होत असून, शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल ३२ विमानांना उशीर झाला, तर रविवारीदेखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शनिवार (दि.४) सकाळी दिल्लीमध्ये दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून इतर ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना मोठा फटका बसला आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली येथे विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून दिल्ली व इतर ठिकाणी जाणाऱ्या तब्बल ३१ विमानांना अर्ध्या तासांपासून ते तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे पुणे व दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. प्रवाशांना थांबण्यासाठी जागादेखील नव्हती.

विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांना महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला. त्यामुळे दिल्लीहून पुण्यात येणाऱ्यांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. पुणे विमानतळावर, तर काही प्रवाशांना खाली बसण्याची वेळ आली होती. दुपारी उड्डाणे सुरू झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास करता आला. रविवारी सकाळी देखील दिल्लीसह इतर शहरात जाणाऱ्या विमानांना उशीर झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना त्रास झाला.