Santosh Deshmukh Murder Case | संंतोष देशमुख हत्याप्रकरणी भावाकडून संशय व्यक्त ; म्हणाले – “सगळे आरोपी पुण्यातच सापडले, त्यांना आश्रय कोणी दिला?”

Santosh Deshmukh Brother

बीड : Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या झाली होती. त्यानंतर २५ दिवस उलटले तरीही मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती. यानंतर आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे हत्या झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांना पकडण्यासाठी सीआयडीने प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांना फरार घोषित केले होते.

त्यानंतर आज दोघांना अटक झाली आहे. तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आतापर्यंत जे आरोपी पकडण्यात आलेत ते पुण्यातून पकडण्यात आले आहेत. यावरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केला आहे.

धनंजय देशमुख म्हणाले, “मी सकाळीच सांगितले होते की योग्य तपास सुरू आहे. लवकरच गुन्हेगार जेरबंद होतील. आम्हाला माहिती समजली की दोन मुख्य आरोपी ताब्यात घेतले आहेत. एक आरोपी राहिला आहे तो ताब्यात येईल. त्यानंतर या सर्वांची कसून चौकशी होईल. खंडणी, हत्या करणे ही संघटित गुन्हेगारी आहे. ६- ७ मुख्य आरोपी असले तरीही हे रॅकेट खूप मोठे आहे. या गुन्हेगारांना खूप लोकांची साथ आहे. त्यामुळे त्यांना अभय मिळाले आहे, म्हणूनच त्यांनी हे घोर कृत्य केले आहे. एक राहिलेला आरोपी ताब्यात घेतल्यानंतर चांगल्याप्रकारे चौकशी होईल.”

ते पुढे म्हणाले, ” पुण्यातून सगळे सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला? हे चौकशीतून समोर येईल. हे सराईत गुन्हेगार आहेत. साधे गुन्हेगार नाहीत. महाराष्ट्रापासून लपून २०-२५ दिवस राहतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावाचा आधार असलेला, आमच्या सर्वांच्या आदर्श असलेल्या माझ्या भावाला न्याय मिळणार नाही”, असे धनंजय देशमुख यांनी म्हंटले आहे.