Pune Crime News | ‘तो बाप जैसा तेरा भी गेम कर दुंगा’ ! वडिलांच्या खुनानंतर आता मुलगा, भाऊ, चुलत्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

3rd January 2025

पुणे : Pune Crime News | २० वर्षापूर्वी वडिलांचा खुन (Murder Case) केल्यानंतर त्यांनी आता मुलाला अडवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चुलते आणि लहान भावांवर कोयता, चॉपर, पालघनने सपासप वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. पूर्ववैमनस्यातून गेले २० वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या दोन कुटुंबातील ही हाणामारी आता दुसर्‍या पिढीत उतरली आहे. (Death Threat)

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) सादिक महंमद शेख (वय ५०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), नूर नजीर शेख (वय २६, रा. नाडेगल्ली, गणेश पेठ), सलीम कासिम तांबोळी (वय ४२, रा. कोंढवा), इरफान बेग (वय २७, रा. नाडेगल्ली, गणेश पेठ) अशा चौघांना अटक केली आहे. त्यांचे इतर साथिदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अजय हरिसिंग परदेशी (वय ४४) आणि जय अनिल परदेशी (वय २१, रा. भवानी पेठ) हे जखमी झाले आहेत. ही घटना काशेवाडी येथील पाटील पार्किंग व बाफना गॅरेज येथे बुधवारी रात्री अकरा वाजता घडली.

याबाबत सोनु ऊर्फ मॉन्टी अनिल परदेशी (वय २७, रा. म्हसोबा मंदिर, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनु यांचे वडिल अनिल परदेशी यांचा सादिक शेख व त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून २००५ मध्ये खुन केला होता. त्यानंतर सादिक शेख व सलीम तांबोळी यांनी अजय हरिसिंग परदेशी यांच्यावर २०११ मध्ये हल्ला करुन खुनाचा प्रयत्न केला होता. त्यात दोघांना शिक्षा झाली होती.

नव वर्षातही हे वैमनस्य संपले नाही. आरोपी हे वेगवेगळ्या गाड्यांवरुन कोयता, चॉपर, पालघन घेऊन आले. त्यांनी प्रथम चुलते अजय हरिसिंग परदेशी व फिर्यादी यांचा लहान भाऊ जय अनिल परदेशी यांची वाट अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना जखमी केले. हे समजल्यावर सोनु परदेशी त्यांना सोडविण्यासाठी तेथे गेला. तेव्हा त्यांनी फिर्यादीचे गळ्यास कोयता लावून ‘‘तू यहॉ से चला जा नही तो बाप जैसे तेरा भी गेम कर दुंगा’’ अशी धमकी देऊन फिर्यादीच्या डोक्यावर हत्याराने हल्ला केला. फिर्यादी यांनी तो हातावर वार अडविल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत.