Junnar Pune Crime News | पुणे: वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या शिक्षक दाम्पत्याने संपवलं जीवन; कौटुंबिक ताणतणावातून दोघांमध्ये झाली होती शाब्दिक चकमक

3rd January 2025

पुणे: Junnar Pune Crime News | कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील शिक्षक दाम्पत्याने डिंभा डावा कालव्यात उडी मारून आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय-२८) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय-२४) असे आत्महत्या केलेल्या शिक्षक दांपत्याचे नाव आहे. या घटनेमुळे वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. (Teacher Couple Suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ३ वर्षे गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक, नाट्य लेखक, कवी सुद्धा होते. त्यांनी लेखन केलेल्या नाटकाचा शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. ते अतिशय संवेदनशील, शिस्तप्रिय शिक्षक असल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली.

त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. चिराग व प्रा. पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील अभंग वस्तीत राहात होते. चिराग, त्याची आई व पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते.

बुधवारी (दि.१) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चिराग व पल्लवी हे दुचाकीवरून वारूळवाडी – ठाकरवाडी रस्त्यावरील डिंभे डावा कालव्यावरील पुलावर आले होते. त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले. मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले.

याबाबतची माहिती वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिली. चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने प्रा. पल्लवी यांचा शोध घेता आला नाही.

दरम्यान कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी डिंभे डावा कालव्यातील पाणी कमी केले. काल (दि.२) सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रा. पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन डॉक्टर दीप्ती कळबकर यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.