Amravati Crime News | पती-पत्नीचा वाद, घर सोडलं अन् माहेरी गेली ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी सासरी कपडे घ्यायला गेली ती परतलीच नाही, मृतदेह आढळल्याने खळबळ

अमरावती: Amravati Crime News | राजेंद्र नगरमधील प्रभू कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाग्यश्री अक्षय लाडे (वय-२८) असे मृत विवाहित महिलेचे नाव असून फ्रेजरपुरा पोलीस फरार संशयित आरोपी पतीचा शोध घेत आहेत. ही खळबळजनक घटना (दि.२) रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक भाग्यश्री हिचे यशोदानगर ते महादेव खोरी दरम्यान भवते लेआऊट परिसरात सासर आहे. तर त्यांचे माहेर हे राजेंद्र नगर परिसरात आहे. ७ वर्षांपूर्वी भाग्यश्री हिचे अक्षय लाडे सोबत लग्न झाले. त्यांना ५ वर्षांची मुलगी आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून पती- पत्नीचा काही कारणावरून वाद झाला आणि पत्नी भाग्यश्री ही माहेरी गेली. त्यानंतर १ जानेवारी रोजी रात्री भाग्यश्री ही तीच्या दुचाकीवरून सासरी कपडे घ्यायला गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री हरवल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी तपास सुरु करून, भाग्यश्रीचा शोध घेतला. त्यावेळी तांत्रिक माहितीवरुन तिच्या मोबाईलचे लोकेशन हे रेल्वे स्थानक परिसरातील असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रेल्वेस्थानक येथे जाऊन पाहिलं असता, तिथं भाग्यश्रीची गाडी दिसली आणि त्यात तिचा मोबाईल दिसला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही तपासले असता तिच्या पतीनेच दुचाकी रेल्वे परिसरात लावली असल्याचे निष्पन्न झाले.
याच सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी भाग्यश्रीचे प्रभू कॉलनी परिसरातील घर गाठले. मात्र, घराला कुलूप लावलेले होते. परंतु पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास यांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला.
भाग्यश्री यांच्या मानेवर आणि पायावर चाकुने वार केल्याचे निशाण होते. पोलिसांनी याठिकाणी फॉरेन्सिकची टीम बोलावली असून, त्यांनी केलेल्या तपासानुसार पतीनेच भाग्यश्री यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत असून, पोलीस संशयित आरोपी पतीचा शोध घेत आहेत.