Chandrapur Crime News | मित्रांसोबत थर्टी फर्स्टची पार्टी केली, त्यानंतर सवंगड्याचा निरोप घेऊन उचलले टोकाचे पाऊल; घटनेने खळबळ

चंद्रपूर : Chandrapur Crime News | ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतर युवकाने विहरीत उडी घेत आपले आयुष्य संपवलं असल्याची घटना उघडकीस आली आहे (Suicide Case). विकास परशुराम वडस्कर (वय-२७ ) असे मृतक युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या सोनापूर गावातील काही मित्रांनी ३१ डिसेंबरच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत विकासने हजेरी लावली होती. मध्यरात्रीपर्यंत पार्टी चालली आणि तो पार्टी आटोपून घरी आला. यावेळी घरची मंडळी गाढ झोपेत होती. साधारण: १ वाजता तो कुणालाही न सांगता अंगणात असलेली दुचाकी घेऊन घराबाहेर पडला.

मुलगा घरी नसल्याचे दिसताच वडिलांनी त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली. मात्र तो रात्रीच घरी गेल्याचे मित्रानी सांगितले. कुटुंबियांनी शोधाशोध केली असता, गावाबाहेर असलेल्या शेतातील विहिरीजवळ दुचाकी उभी दिसून आली.विहीरीत चप्पल तरंगत होती. त्यामुळे विहिरीत गळ टाकून पाहिले असता विकासचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. विकासच्या पश्चात आई, वडील, आजोबा, बहिण व भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.