Pune Cyber Crime News | नवीन क्रेडिट कार्ड अॅक्टिवेट करण्यापूर्वीच लाटले 11 लाख; सायबर चोरट्यांचा नवा सापळा

पुणे : Pune Cyber Crime News | व्यावसायिकाला तुमच्या अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर फ्रॉड ट्रान्झेक्शन झाले असून ते कार्ड कॅन्सल करुन नवीन क्रेडिट कार्ड देत असल्याचे सांगितले. व्यावसायिकाचे जुने कार्ड ब्लॉक करुन त्यांना कुरिअरने नवीन क्रेडिट कार्ड आले. त्यांनी ते अॅक्टिवेट करण्यास गेले असताना त्यांच्या नवीन क्रेडिट कार्डवर अगोदरच ११लाख ६९ हजार ७४१ रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते.
याबाबत शिवाजीनगर (Shivaji Nagar Pune) येथे राहणार्या ३३ वर्षाच्या व्यवसायिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २२ नोव्हेबर रोजी घरी असताना त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन आला. आम्ही अमेरिकन एक्सप्रेस कस्टमर केअरमधून बोलत आहे. तुम्ही ९९९ डॉलरमध्ये ट्रान्झेक्शन करत आहात का, असे विचारले. त्यावर त्यांनी नाही सांगितल्यानंतर त्यांनी हे तुमच्या क्रेडिट कार्डवरील फ्रॉड ट्रान्झेक्शन असून आम्ही ते कॅन्सल करत आहोत. तसेच तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड प्रोव्हाईड करत आहोत, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांचे अमेरिकन एक्सप्रेस कंपनीचे जुने क्रेडिट कार्ड त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्लॉक केले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी त्यांचे जुन क्रेडिट कार्ड कॅन्सल होऊन नवीन अमेरिकन एक्सप्रेस कंपनीचे नवीन क्रेडिट कार्ड कुरिअरद्वारे प्राप्त झाले. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी ते नवीन अमेरिकन एक्सप्रेस कंपनीचे क्रेडिट कार्ड अॅक्टिवेट करण्यासाठी गेले असताना त्यांच्या नवीन क्रेडिट कार्डवर ४ नोव्हेंबर रोजी काही अनाधिकृत ट्रान्झेक्शन झाले असल्याचे दिसत होते. त्यांना नवीन क्रेडिट कार्ड मिळण्यापूर्वीच एकाच दिवसात ४ नोव्हेंबरला ७ ट्रान्झेक्शनमधून तब्बल ११ लाख ६९ हजार ७४१ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ननवरे तपास करीत आहेत.