Pune Crime News | परकीय चलनामुळे सराईत चोरटा जेरबंद; घरफोडीतील 8 लाखांचा ऐवज हस्तगत

पुणे : Pune Crime News | संशयावरुन एकाला पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली. त्यात त्याच्याकडे सोन्याचे दागिने व परकीय चलन मिळाले. त्याच्या चौकशीतून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. (Arrest In House Burglary)
आर्यन अजय माने Aryan Ajay Mane (वय २०, रा. भेकराईनगर, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोटारसायकल, रोख रक्कम असा एकूण ८ लाख २ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
कॅम्पमधील घरातील कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी १५ लाख ६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इस्कॉन मंदिराचे शेजारील मोकळया जागेत एक तरुण संशयास्पदरित्या थांबला आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले. तेथे थांबलेल्या आर्यन माने याला पकडून त्यांची झडती घेतली. त्याच्याकडे सोन्याचे दागिने व परकीय चलन मिळाले. अधिक चौकशी करता त्याने व त्याचा मित्र दत्ता लंगडे यांनी कॅम्प परीसरातून एका बंगल्यामधून सोन्याचे दागिने व परकीय चलन चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, मोहन काळे, प्रदिप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, विष्णु सरवदे, ज्ञानेश्वर बडे, महेश जाधव, मनोज भोकरे, शिवाजी सरक तसेच गुन्हे शाखा अंगुली मुद्राचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप बेले व त्यांच्या पथकाने केली आहे.