Junnar Pune Crime News | पुणे: वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण करत 12 तोळे सोने घेऊन चोरटे पोबारा, कानातील दागिने अक्षरशः ओरबाडून नेल्याने कानाला 12 टाके, दाम्पत्य गंभीर जखमी

पुणे : Junnar Pune Crime News | जुन्नर तालुक्यात वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने व रोख १ लाख २० हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) मध्यरात्री घडली. वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातील दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याने दोन्ही कानाला दुखापत झाली आहे, तसेच डोक्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याने डोक्याला व कानाला १२ टाके पडले आहेत. हे दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Robbery Case)

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळ्यात तुकाराम गणपत आतकरी (वय -७२) व त्यांची पत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी (वय-६५) हे दोघेच राहतात. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व लाकडी दांडक्याने या वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले, तसेच कानातील दागिने निघत नसल्यामुळे अक्षरशः ते ओरबडून काढल्याने त्यांचे दोन्ही कान तुटले आहेत. वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच लॉकरमधील दागिने, रोख १ लाख २० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.

या दाम्पत्याला जबर मारहाण झाल्याने दोघेही बेशुद्ध पडले होते. काही वेळाने तुकाराम आतकरी शुद्धीवर आल्यावर त्यांनी बाजूच्या घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे बाजूचे लोक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व याबाबतची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली.

काही वेळातच नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहोचले. डॉग स्कॉड व दरवाजावरील बोटांचे ठसे घेण्यासाठी ‘फिंगरप्रिंट एक्सपर्ट’ यांना पाचारण केले होते. या घटनेबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक जे. पाटील करीत आहेत.