PMC Recruitment 2025 | पुणे महापालिकेची रखडलेली 100 कनिष्ठ अभियंता भरती लवकरच

पुणे : PMC Recruitment 2025 | महापालिकेतील रखडलेली १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय झाल्याने ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P) यांनी दिली.

  महापालिकेने मागीलवर्षी लोकसभा निवडणुकीपुर्वी १०० कनिष्ठ अभियंता भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार जाहीरात देखिल देण्यात आली होती. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत. दरम्यान, त्यावेळी मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातूनही अर्ज दाखल करण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नव्हता. राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ओबीसी प्रवर्गातून नोकरभरतीत सामावून घेण्याचा अध्यादेश काढल्याने महापालिकेने अभियंता भरतीची प्रक्रिया थांबविली होती.

   दरम्यान, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर यापुर्वी थांबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियांना सुरूवात झाली आहे. महापालिकेने देखिल अभियंता भरतीसाठी आयपीबीएस या संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी परीक्षेचे नियोजन करण्याबाबत चर्चा केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, की राज्य शासनाच्या आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून नोकरीमध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच आर्थिक मागास वर्गासाठी देखिल आरक्षणाचा आदेश आहे. या पार्श्‍वभूमीवर अभियंता भरतीची नव्याने जाहिरात काढण्याबाबत आम्ही तयारी करत आहोत. यापुर्वी आलेल्या अर्जांबाबत तसेच फीबाबतही काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडून १५ जानेवारीपयर्र्र्त भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आमचा प्रयन राहील.