Organ Donation In Pune | पुणे : मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे…! वर्षभरात 70 मृत अवयव दान तर 181 जणांचे वाचले प्राण; प्रत्यारोपण समन्वय समितीची माहिती

पुणे : Organ Donation In Pune | पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयवदानाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये केलेल्या ६३ अवयवदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. मागील २० वर्षात समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत या केंद्राने एकूण ५५७ देणग्या दिल्या असून १,३५५ जणांचे प्राण वाचले आहेत.
यावर्षी विविध क्षेत्रातील नागरिकांनी आपले अवयव दान करण्यासाठी पाऊल पुढे टाकले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चित्रपट, निर्माते, पत्रकार, वैद्यकीय, वैमानिक आणि उद्योजकांचा समावेश आहे. यातून त्यांची समाजाप्रती बांधिलकी असल्याचे दिसून आले आहे. सरकारी रुग्णालयांनी अवयव प्रत्यारोपण कामगिरीला मोलाचा हातभार लावला आहे.
सार्वजनिक आरोग्य सुविधांद्वारे ७ अवयव दान करण्यात आले आहे. त्यात ससून रुग्णालयातील १ आणि कमांड हॉस्पिटलमधील ६ अवयव दानांचा समावेश आहे. यावरून अवयवदानाला पाठिंबा देण्याबाबत सार्वजनिक क्षेत्रातील वाढती जागरूकता आणि बांधिलकी दिसून येत आहे. संस्थेच्या स्थापनेपासून ग्रीन कॉरिडॉर सारखे उपक्रम राबविले जात आहे. ज्यामुळे अवयवांची जलद वाहतूक शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचविले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात अवयव दान करण्यासाठी जागरुकता निर्माण होत आहे.
पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने नवनवीन संशोधन करत नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळेच २० वर्षात ५५७ मृत अवयवांच्या मदतीने १,३५५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.
विभागीय प्रत्यारोपण समितीला पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयव प्राप्त झाले असून पुणे परिमंडळातील प्रत्यारोपण केलेल्या अवयवांची संख्या १८१ आहे. यामध्ये मूत्रपिंड ९३, यकृत ५८, हृदय ६, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड ४, हृदय आणि फुफ्फुस १, १४ फुफ्फुसे अवयवांचा समावेश आहे.
‘पुणे झोनल ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी’चे अध्यक्ष ए.जी. हुपरीकर म्हणाले, ” झेडटीसीसी पुणे डॉक्टर आणि समन्वयकांचे त्यांच्या अढळ समर्पणाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. दुःखाचे समुपदेशन करत अवयव दान करणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी केलेल्या दयाळू प्रयत्नांमुळे दुःखाचे आशेत रूपांतर झाले असून, अवयवदानाचे कार्य अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे. अशा प्रेरणादायी निर्णयामुळे १८१ जणांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.”