Nagpur Crime News | नातेवाईक बाप-लेकानेच पैशाच्या वादातून 2 सख्ख्या भावांवर चाकूने हल्ला करून संपवलं

नागपूर : Nagpur Crime News | दोन सख्ख्या भावांवर त्यांच्या दूरच्या नातेवाईकाने चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना गांधीबाग गार्डनजवळ घडली आहे. रवी राठोड आणि दीपक राठोड अशी मृत भावांची नावे आहेत. तर मदनसिंग राठोड, अभिषेक आणि सोनू राठोड अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे पिता-पुत्र आहे. व्यावसायिक वादामुळे हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. (Murder Case Nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीबाग गार्डन जवळील काली माता मंदिरासमोर ही घटना घडली. आरोपी आणि मृत व्यक्ती या दोघांचा बांगड्यांचा व्यवसाय आहे. मृत रवी आणि दीपक या भावंडांचा गेल्या काही दिवसांपासून आरोपी मदनसिंगसोबत व्यवसायाच्या पैशावरून वाद सुरू होता.

रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आरोपीने रवी राठोडवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. भावावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती मिळताच दीपक त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र आरोपी बाप-लेकाने दीपक वरही चाकूने वार केले. भावाला वाचवण्यासाठी गेलेला दीपक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राठोड कुटुंबीयांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.