Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे भाष्य; म्हणाले – ” जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत…”

मुंबई : Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) पुण्यात सीआयडीला शरण गेल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” बीडच्या प्रकरणात कोणालाही आम्ही सोडणार नाही, अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. यात तपास अतिशय गतिशील करण्यात आला आहे, त्यामुळेच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. हत्येत इतर जे आरोपी सामिल आहेत त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामी लागल्या आहेत. कोणालाही आम्ही सोडणार नाही.
संतोष देशमुख यांच्या बंधुंशी माझे फोनवरुन बोलणे झालेले आहे. जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तो पर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील. कोणता गुन्हा दाखल होईल? काय होईल? हे सर्व पोलीस सांगतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला दिली आहे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कोणाचाही दबाव त्यांच्यावर चालू देणार नाही.”
धनंजय मुंडेंवरील कारवाईवर बोलताना ते पुढे म्हणाले, ” कोणी काहीही म्हणत असले तरी पोलीस जो काही पुरावा आहे, त्याच्या आधारेच कारवाई करतील. जिथे पुरावा आहे त्याला सोडले जाणार नाही. मला राजकारणात जायचे नाही, मी पहिल्यापासून सांगतो ज्याच्याविरोधात पुरावा असेल तसेच दुसऱ्या कोणाकडेही हा पुरावा असेल तर त्याने द्यावा, हत्येप्रकरणी शिक्षा होणे महत्वाचे आहे. ज्यांना राजकारण महत्वाचं आहे त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ, मला यावर कोणतीही राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही ” , असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.