Accident On Patas-Baramati Palkhi Marg | वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; पाटस-बारामती पालखी महामार्गावरील घटना

पुणे : Accident On Patas-Baramati Palkhi Marg | दौंड तालुक्यातील (Daund) पाटस-बारामती श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर (Sant Tukaram Maharaj Palkhi Marg) वासुंदे हद्दीत स्विफ्ट मोटारीचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अक्षय बाळासाहेब चव्हाण (रा. चिचणी, ता. शिरूर,जि-पुणे), प्रिती विशाल भोसले (रा. पाटस, ता. दौंड, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दुभाजक व नंतर पुलाच्या कठडयाला धडकून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटस बारामती पालखी महामार्गाने अक्षय चव्हाण व पाटस येथील प्रिती भोसले हे दोघे सोमवारी (दि. ३०) साडेबारा वाजता चारचाकी स्विफ्ट मोटारीतून बारामतीला जात होते. वासुंदे गावच्या हद्दीत येताच अक्षय यांचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी मोटार रस्त्याच्या दुभाजकाला व नंतर पुलाच्या कठड्याला धडकली. चालक अक्षय व प्रिती गंभीर जखमी झाले. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
चारचाकीतुन दोघांना तात्काळ बाहेर काढुन दुसऱ्या वाहनातुन उपचारासाठी बारामती येथे पाठविले. मात्र, उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कुरकुंभ पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक फौजदार श्रीरंग शिंदे आदी पोलिसांनी घटनास्थळी हजर होवुन पाहणी केली.