Palghar Accident News | दुचाकी अन् कारच्या भीषण अपघातात विशीतल्या तिघांचा जागीच मृत्यू ; परिसरातून हळहळ व्यक्त

पालघर : Palghar Accident News | दुचाकी आणि इको कारची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात विशीतल्या तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. हा अपघात कासा -सायवन मार्गावर घडला आहे. राहुल हरके (वय-२०), चिन्मय चौरे (वय-१९) आणि मुकेश वावरे (वय-२०) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. हे तीनही तरुण डहाणू तालुक्यातील कासा चारोटी परिसरातील रहिवासी होते.

या अपघातात इको कार मधून प्रवास करणारी एक महिला जखमी झाली असून रीना मोरे असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलेला उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कासा – सायवन मार्गावरून राहुल, चिन्मय आणि मुकेश एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट निघाले होते. त्यांच्या भरधाव दुचाकीने वाघाडी येथील गेल इंडिया कंपनी नजीक समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कार जागीच उलटली. अपघातात दुचाकीचा देखील चक्काचूर झाला आहे.

भीषण अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली. तातडीने स्थानिकांनी अपघातग्रस्तांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना तपासून तरुणांना मृत झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत.