Unauthorized Scrap Shops in Pune | पुण्यातील अनाधिकृत भंगार दुकानाचा प्रश्न ऐरणीवर; मुंढवा येथील बी टी कवडे रोडवरील भंगार दुकानमालकावर गुन्हा दाखल

निवासी भागात भंगार दुकाने कशी? अनाधिकृत भंगार दुकानांना स्थानिक पोलिसांचा आशिर्वाद?

पुणे : Unauthorized Scrap Shops in Pune | मुंढवा येथील बी टी कवडे रोडवरील (Mundhwa Bt Kawade Road) भंगार दुकानात फ्रीजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला असून तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतेही उपाय योजना न करता निष्काळजीपणाने तोडफोडीचे काम करण्यास सांगितल्याने मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) भंगार दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. निवासी भागात आगीच्या घटना वाढत असून बेकायदेशीरपणे उभारल्या जाणार्‍या या भंगार मालाच्या दुकानावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. हप्तेखोरीतून अशा भंगार दुकानाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच कुदळवाडी येथील १० ते १५ भंगार मालाच्या दुकानांना आग लागली होती.

मुंढवा येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोट प्रकरणी किशोर प्रल्हाद साळवे (वय ३७, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भंगार दुकान मालक मोहम्मद सय्यद (रा. रामटेकडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या स्फोटात मेहमूद शेख यांचा मृत्यु झाला आहे.

फिर्यादी व मेहमूद शेख हे मोहम्मद सय्यद यांच्या भंगाराच्या दुकानात काम करत होते. मालकाने फिर्यादी व मेहमूद शेख यांना भंगारात आलेल्या वस्तू फोडून त्यातील विविध धातू वेगवेगळे करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी व मेहमूद शेख हे काम करत होते. मोहम्मद सय्यद यांच्या सांगण्याप्रमाणे मेहमूद शेख हे फ्रिजचा कॉम्प्रेसर फोडत असताना त्याचा अचानक स्फोट होऊन त्यात मेहमूद शेख जागीच मृत्यु पावले. फिर्यादी, मालक मोहम्मद सय्यद व दिलीप मिसाळ हे तिघे जखमी झाले.

निवासी भागात भंगार दुकाने कशी?

अग्निशमन दलाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान तब्बल १ हजार ४९३ आगीच्या घटना घडल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. निवासी भागातील आगीच्या घटनांची संख्या वाढत आहे. निवासी भागात भंगार दुकानांची वाढती संख्या आणि संबंधित आगीच्या जोखमींकडे नागरिकांनी वेळोवेळी लक्ष वेधले असले तरी त्याकडे प्रशासन, पोलीस यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष झाले आहे.

भंगार दुकानांना आगी लागल्याच्या दर महिन्याला दोन घटना घडत असतात. ही ठिकाणे सामान्यत: मोकळ्या जागेत किंवा तात्पुरत्या टिन शेडमध्ये उभारलेली असतात. तेथे सुरक्षा उपायांचा अभाव असतो. झोपडपट्टी भागात आणि स्क्रॅप यार्डमध्ये आगी लागण्याची संख्या वाढत चालली आहे.

हडपसर परिसरातील एका भंगार दुकानाला नुकतीच मोठी आग लागली होती. या भंगार दुकानांकडे दुर्लक्ष केल्यास पुण्यातही पिंपरी प्रमाणे कुदळवाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.