Pune Rain News | पुण्यात बरसणार हलक्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : Pune Rain News | हवामान विभागाने शुक्रवार (दि.२७) पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात कोठेही पावसाची नोंद झाली नाही. शनिवारी देखील (दि.२८) पुण्यात दुपारनंतर हलक्या स्वरूपात सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारपासून मात्र संपूर्ण आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शुक्रवारी थंडीची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान १६.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचप्रमाणे पाषाण, लवळे, लोहगाव, चिंचवड येथे एक ते दोन अंशांच्या फरकाने तापमान स्थिर होते, तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे किमान तापमान १५.५, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस होते. शनिवारी मात्र कमाल तापमान स्थिर राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार आहे.
पुण्यात शनिवारी किमान तापमानात ४ अंशांनी वाढ होऊन ते १९ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. शनिवारी कोकणात हवामान कोरडे राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.