Palghar Train Accident | क्रॉसिंगवरील रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पालघर : Palghar Train Accident | पालघर रेल्वे स्थानक परिसरातून गुजरातकडे पुढे जुना पालघर हनुमान मंदिर भागातून रेल्वे रूळ ओलांडत असताना ट्रेनचा अंदाज न आल्याने रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये सोनू राम (वय-३५), मोनू राम (वय-१८) या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुप तिवारी हा २० वर्षीय तरुण गंभीर जखमी आहे. या अपघातातून प्रदीप कुमार हा तरुण थोडक्यात बचावला.
शुक्रवारी (दि.२७) रात्री ८.३० च्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकावरून जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गुजरातच्या दिशेने जात होती. त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही जण पालघरमधील एका कंपनीत काम करत होते. रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या भाजी बाजारातून ते भाजी घेऊन पूर्वेकडील आपल्या घरी जात असताना हा प्रकार घडला. रेल्वे अपघातात मृत्यू झालेले तरुण हे उत्तर प्रदेशातील मोतिहारी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ते पालघरमध्ये कामासाठी आले होते आणि अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला.
दोघांचे मृतदेह पालघर लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून अनुप तिवारीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. याआधीही या रेल्वे क्रॉसिंगवर रूळ ओलांडताना अनेकांना जीव गमवावा लागला आहे.