Mumbai Wadala Crime News | मित्राने सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकवलं, हाताची नस कापत तरुणाने संपवलं जीवन

मुंबई : Mumbai Wadala Crime News | मित्राने सेक्स रॅकेट प्रकरणात अडकवल्याने घाबरलेल्या तरुणाने हाताची नस कापत आपलं जीवन संपवल्याची घटना वडाळा येथून समोर आली आहे. तन्मय केणी (वय-२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. (Suicide News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा येथे राहणारा सचिन करंजे (वय-२५) हा मुलींना कामाला लावण्याच्या नावाखाली त्यांना लॉजवर घेऊन जात असत. त्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत असे. अनेक मुलींसोबत त्याने असे प्रकार केले. अखेर एका मुलीने याबाबत तक्रार वडाळा पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सचिन करंजे याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
त्यावेळी सचिन हा त्याचा वडाळ्यातील प्रतीक्षा नगर परिसरात राहणारा मित्र तन्मय केणी याचे आधारकार्ड वापरून मुलींना लॉजमध्ये घेऊन जात असल्याची माहिती समोर आली. याच प्रकरणी १७ डिसेंबर रोजी तन्मय केणी याला पोलिसांनी चौकशीसाठी वडाळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले. यावेळी तन्मय पोलीस स्टेशन मधून पळून गेला. तन्मय हा १० दिवस फरार होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केली.
बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यात सुरुवात केली. त्यानंतर गुरुवारी मुलुंड येथील छेडा नगर पेट्रोल पंपाजवळ तन्मय स्वतःच्या हाताची नस कापलेल्या बेशुद्ध अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
तन्मय ज्याठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच ठिकाणी पोलिसांना चिठ्ठी सापडली. तन्मयने या चिठ्ठीत सचिन करंजे याच्या नावाचा उल्लेख केला होता. ‘मला सचिनने फसवले. तो मला ब्लॅकमेल करत आहे. त्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. त्याला फाशी झाली पाहिजे. सॉरी मम्मी पप्पा’, असे तन्मयने चिठ्ठीत नमूद केले. या प्रकरणी वडाळा आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.