Mohan Joshi On Manmohan Singh | पुण्याच्या विकासात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंगजी यांचे मोठे योगदान !

पुणे : Mohan Joshi On Manmohan Singh | देशातील वाढत्या नागरीकरणात शहरांचा विकास नियोजनबद्ध व्हावा, यासाठी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंगजी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशन (जेएनआरयूएम) हाती घेतले त्यातून पुणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले. एवढा भरीव निधी मिळणारे पुणे हे देशातील एकमेव शहर ठरले. त्यामुळे पुण्याच्या विकासाला मोठा हातभार लागला, यामुळे आम्ही पुणेकर त्यांचे ऋणीच राहू, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे.

डॉ.मनमोहन सिंगजी दूरदृष्टीचे आणि संयमाने भरीव योजना राबविणारे नेते होते. शहरांच्या विकासासाठी जेएनआरयूएम ही चांगली योजना त्यांनी आखली होती. वाहतुकीची कोंडी सुटावी, रस्ते, चौक प्रशस्त व्हावेत, नद्यांच्या पाण्याचे शुद्धीकरण व्हावे, शहरांमध्ये सांडपाणी निचऱ्याचे जाळे उभे रहावे, शहराचे पर्यावरण राखले जावे अशा विचारातूनच त्यांनी जेएनआरयूएम योजना आखली. त्यातून बीआरटी, नवीन बस खरेदी, नदी सुधार योजना यांना चालना मिळाली. पुणे मेट्रो साठी आवश्यक मंजुरी डॉ.मनमोहन सिंगजी यांच्या काळातच मिळाली.

केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री असताना, डॉ.मनमोहन सिंगजी यांनी अर्थव्यवस्थेची नव्याने मांडणी केली. त्यातून व्यापार, उद्योग या क्षेत्रांना बळकटी आली. मुख्य म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारी धोरणे त्यांनी अर्थमंत्री आणि पंतप्रधान असताना राबविली. जागतिक मंदीच्या काळात त्याच्या झळा त्यांनी भारतीयांना लागू दिल्या नाहीत, हे डॉ.मनमोहन सिंगजी यांचे मोठे यश होते. डॉ.मनमोहन सिंगजींची ऐतिहासिक कारकीर्द भारतीय कधीच विसरणार नाहीत. डॉ.मनमोहन सिंगजींना विनम्र श्रद्धांजली!

सन २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉ.मनमोहन सिंगजी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली होती. तेव्हा मी पक्षाचा पुणे शहराध्यक्ष होतो. त्यांचे स्वागत मी केले होते. त्यांनी सगळ्यांशी अतिशय विनयशीलतेने संवाद साधला होता. त्यांच्या सहज वागण्यामुळे ती भेट संस्मरणीय ठरली.

  • मोहन जोशी