Kolhapur Crime News | शाळेत स्न्हेहसंमेलनावेळी झालेल्या वादातून युवकाचा धारदार शस्त्राने खून, एकजण गंभीर जखमी

कोल्हापूर : Kolhapur Crime News | शाळेत स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेलेल्या युवकावर हल्ला करत त्याचा खून करण्यात आल्याची घटना (दि.२६) इचलकरंजी येथून समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांनी चाकू आणि गुप्तीने भोसकून प्रसाद संजय डिंगणे (वय-१७, रा. जवाहरनगर) या युवकाचा निघृण खून केला आहे.
तर यावेळी झालेल्या हल्ल्यात त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील (वय-२२, रा. जवाहर नगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कबनूर हायस्कूल परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर येथे राहणारा प्रसाद डिंगणे हा कबनूर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला होता. त्यास जवाहरनगर भागातील चार ते पाच हल्लेखोरांनी शाळेबाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरू केली. याची माहिती कळताच प्रसादचे दोघे मित्र धावून आले.
यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी चाकूने प्रसादवर वार केले. यात बरगडीत गुप्तीसारख्या हत्याराचा घाव वर्मी बसल्याने प्रसाद जागीच कोसळला, तर सौरभ पाटील याच्या हातावर, कमरेवर तसेच पाठीवरही चाकूने वार करण्यात आले. त्यात तो जखमी झाला.
ही घटना घडताच शाळेतील स्नेहसंमेलन तातडीने थांबविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. पोलिसांनी या घटनेबाबत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.