FDA On Blood Banks In Pune | पुणे : ‘या’ कारणांमुळे 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित तर 1 परवाना रद्द, FDA कडून मोठी कारवाई

पुणे : FDA On Blood Banks In Pune | रक्ताचा तुटवडा असताना दुसऱ्या राज्यात रक्ताचा साठा पाठविणे तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील एका रक्तपेढीचा परवाना रद्द केला असून, इतर २९ रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. ३२ रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, तर तीन रक्तपेढ्यांवरील कारवाई प्रलंबित आहे.
अन्न व औषध प्रशासनाने यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान पुणे विभागातील (पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर) ८१ रक्तपेढ्यांची विशेष मोहिमेद्वारे तपासणी केली होती. त्यामध्ये नियम न पाळणाऱ्या रक्तपेढ्यांवर हा कारवाईचा बडगा उगारला आहे. एका रक्तपेढीस स्पष्टीकरण मागविण्याची शिफारस संयुक्त तपासणी पथकाद्वारे करण्यात आली आहे.
विभागाकडून एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत माहिती संकलित करून दिल्लीतील राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व औषध नियंत्रक यांना कळवण्यात येऊन संयुक्त तपासणी केली होती. या प्रकरणी पुणे विभागातील औषध निरीक्षक, केंद्रीय औषध निरीक्षक तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर यांच्या पथकाने ही तपासणी केली होती.