Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case | मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ” संतोष देशमुख प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”

बीड : Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने आणि हालहाल करून आरोपींनी संपवलं. अजूनही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

सत्ताधारी आमदारांनी या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड (Valmik Karad) यांचे नाव समोर आले आहे. यावरून धनंजय मुंडेंविरोधात विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला असतानाचा धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ” वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याशीही होती. ते माझ्याही जवळचे आहेत. गुन्हा दाखल झाला आहे, त्याची चौकशी पोलीस करत आहेत. अतिशय पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. शासन कोणालाही पाठीशी घालत नाही.

पण माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजाडत नसेल तर आपण काही बोलू शकत नाही. माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे, हे प्रकरण भयंकर आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”, असे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.