Yerawada Pune Crime News | आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करण्यास गेलेल्या इंजिनिअरला पोलिसांनी आणले शोधून; येरवडा पोलिसांची कामगिरी

पुणे : Yerawada Pune Crime News | मध्यमवर्गीय कुटुंबातील इंजिनिअर, भिडस्त स्वभाव, एका आर्थिक योजनेत पैसे गुंतवून त्यात फसवणूक झालेला. लोकांचे पैसे देता येत नसल्याने मनातून खचलेल्या तरुणाने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडलेला. येरवडा पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन काढले. ते होळकर पुलाजवळ येत होते. त्या परिसरात शोधल्यानंतरही तो सापडला नाही. तेव्हा त्याने पाण्यात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय बळावला. परंतु, तसे पाहणारे कोणी पुढे आले नाही. येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) आपले प्रयत्न सुरु ठेवले. मध्यरात्री त्याने मोबाईल सुरु केला. येरवडा पोलीस त्यावर लक्ष ठेवून होते. जसा त्याने मोबाईल सुरु केला़ पोलिसांनी तेथे जाऊन खडकीतील मोकळ्या मैदानात अंधार्‍या जागी विमनस्क अवस्थेत बसलेल्या या इंजिनिअरला ताब्यात घेऊन समुपदेशन करुन पत्नीच्या हवाली केले. दुपारी साडेतीन वाजता सुरु झालेली ही शोध मोहिम मध्यरात्री साडेबारा वाजता तब्बल आठ तासाने यशस्वीपणे संपली.

संगमवाडी येथे राहणार्‍या एका इंजिनिअरने अभिषेक बिराजदार याच्याकडे लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणुक केली होती. पावणे अकरा लाख रुपये गुंतविल्यानंतर त्याच्याकडून ३५ लाख रुपये येणे होते. अभिषेक बिराजदार याने फसवणूक केल्याचा पिपंरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोठी आर्थिक फसवणूक झाल्याने व लोकांचे पैसे देता येत नसल्याने हा ४३ वर्षाचा इंजिनिअर मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने अभिषेक बिराजदार हा जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून घरातून निघून गेला होता. त्याच्या पत्नीने येरवडा पोलिसांना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता याची माहिती देऊन त्याचा शोध घेण्याची विनंती केली. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे व त्यांच्या सहकार्‍यांनी शोध मोहिम सुरु केली. त्याचा मोबाईल सतत बंद येत होता. लास्ट लोकेशन सायंकाळी पावणे सात वाजता होळकर पुल असे येत होते. त्या परिसरात त्याचा शोध घेतला पण तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय बळावत होता. तरीही पोलिसांनी प्रयत्न सोडले नाहीत. २५ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजून २२ मिनिटांनी त्याने मोबाईल फोन सुरु केल्याचे लामखडे यांना तांत्रिक बाबीवरुन समजले. पोलिसांनी नव्याने त्याचे लोकेशन काढले. ते खडकी येथील चर्चच्या जवळील मोकळ्या मैदानात येत होते. तातडीने पोलीस पथक तेथे गेले. त्यांनी मोकळ्या मैदानात अंधार्‍या ठिकाणी विमनस्क अवस्थेत बसलेला एक जण दिसून आला. ज्याला ते शोधत होते, तोच हा इंजिनिअर होता. पोलिसांनी त्याचे समुपदेशन करुन पत्नीच्या हवाली केले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, फौजदार शिंदे, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व तांत्रिक विभागाचे पोलीस हवालदार किरण घुटे यांनी ही कामगिरी केली.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे यांनी सांगितले की, भिडस्त स्वभावाचा हा इंजिनिअर लोकांचे पैसे देता येत नसल्याचे मानसिक तणावात होता. आम्ही त्याला चांगल्या गोष्टी सांगून त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्यातून आत्महत्येचे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न केला.