Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात, तब्बल 12 लाख महिलांचा नव्याने समावेश; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

Ladki-Bahin-Yojana

मुंबई : Ladki Bahin Yojana | ज्या महिलांना आधार कार्ड सिडिंग प्रक्रियेमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते त्या लाडक्या बहिणींना देखील आता पैसे मिळणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. तब्बल १२ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. या सर्व महिलांना आजपासून लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरे यांनी अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ” महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.”

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदिती तटकरे म्हणाल्या, ” डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या निधी वितरणाची सुरूवात आपण आजपासून करत आहोत. साधारणपणे ९ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचे डिबीटी केले होते. त्यावेळी जवळपास २ कोटी ३४ लाखांपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेचा लाभ दिला होता. डिसेंबर महिन्याचा आज हफ्ता वितरित करत असताना यामध्ये २ कोटी ३४ लाख महिलांचा समावेश आहेच. पण ज्या महिलांना आधार सिडींग मुळे लाभापासून वंचित राहावे लागले होते. त्यामधील ज्यांचे आधार सिडिंग झाले आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा निधी वितरणाची सुरूवात करत आहोत. “

त्या पुढे म्हणाल्या, ” साधारण २ कोटी ३४ लक्ष आणि आता आधार सिंडिंग झालेल्या लाभार्थीना येत्या ४ ते ५ दिवसात टप्प्या टप्प्याने लाभाचे वितरण करणार आहोत. नव्याने आधार सिंडिंग झालेल्यांपैकी १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ वितरणाची सुरूवात केली आहे. ६७ लाखांपेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरीत करत आहोत. उद्या, परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरीत केला जाईल. त्यामुळे अधिकाधिक महिलांना तीन ते चार दिवसांच्या कालावधीत लाभाचे पैसे पोहोचणार आहेत “, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.