Kolhapur Accident News | छोटा हत्ती अन् दुचाकीचा भीषण अपघात, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी, मुलगी गंभीर जखमी

कोल्हापूर : Kolhapur Accident News | कोडोली- बोरपाडळे रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर भरधाव छोटा हत्ती आणि दुचाकी या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संतोष बबन गोसावी (वय-४०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी पूजा संतोष गोसावी (वय-३५) व मुलगी पूनम (रा- वैभवनगर, कोडोली, ता- पन्हाळा) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

हा अपघात मंगळवार (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातांनंतर मद्यधुंद असलेला चालक रमजान बालेखान दरवेशी (रा-कुसूर, ता-कराड) याला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, ” संतोष गोसावी हे पत्नी पूजा व मुलगी पूनम यांच्यासह दुचाकीवरून आरळे येथून कोडोली कडे येत होते. यावेळी वाठार कडून बोरपाडळेकडे भरधाव वेगाने चाललेल्या छोटा हत्ती या मालवाहतूक वाहनाची दुचाकीला समोरून जोरदार धडक बसली. त्यामध्ये संतोषच्या छातीला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

धडक इतकी जोरात होती की, पूजा या सुमारे २५ फूट उडून शेतामध्ये जाऊन पडल्या. त्यांच्या छातीसही जबर मार लागला. मुलगी पूनम हिच्या उजव्या पायास मोठी दुखापत झाल्याने या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कोडोली येथील यशवंत धर्मादाय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.