CCTV Camera In PMPML Bus | पुणे: प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाचा मोठा निर्णय, तब्बल 1 हजार बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार

CCTV Camera In Bus

पुणे : CCTV Camera In PMPML Bus | गेल्या काही वर्षांत पीएमपी बसमध्ये चोरीसह महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेटहून वाकडेवाडी कडे जाणाऱ्या बसमध्ये पुरुषाने महिला प्रवाशाला छेडल्याने चोप दिल्याची घटना नुकतीच घडली. या सर्व पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या मालकीच्या सुमारे १००६ बसेसमध्ये प्रत्येकी तीन कॅमेरे बसविले जाणार आहेत. याच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू असून, येत्या दोन महिन्यात प्रत्येक बसमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहेत. हे कॅमेरे चांगल्या दर्जाचे असल्याने बसमधील प्रवाशांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात २१०० बस असल्या तरीही प्रत्यक्षात रस्त्यावर १६५० बस धावत आहेत. पैकी १००६ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. उर्वरित बस भाडेतत्त्वावरील आहेत. पीएमपी प्रशासन पहिल्यांदाच मालकीच्या बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवीत आहेत. पीएमपी बसमधून दररोज सुमारे १३ लाख प्रवासी प्रवास करतात. पैकी १००६ बसमध्ये टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविले जाणार असल्याने किमान ९ लाख प्रवासी प्रशासनाच्या नजरेत राहणार आहेत.

‘पीएमपीएमएल’चे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर म्हणाले, ” बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील.”