Stray Dogs Issue Pune | पुणे: भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, शहरात 11 महिन्यात तब्बल 23 हजार 374 नागरिकांवर कुत्र्याचा हल्ला

पुणे : Stray Dogs Issue Pune | शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांची सर्वत्रच दहशत पसरली आहे. आंबेगाव पठारमधील चंद्रागण सोसायटी फेज नंबर ०७ मध्ये पार्किंगमध्ये खेळत असताना समर्थ सूर्यवंशी या ५ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरासह उपनगरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात हॉटेल्स, खाऊगल्ल्या, कचरापेट्या, मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आढळतात. गल्लीबोळांमध्ये समूहाने राहणारी भटकी कुत्री रात्री-अपरात्री गाड्यांवर धावून जातात. वाहनचालकाच्या पायाचा चावा घेतात.

पद पथांवर चालणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसात शहरात अशा काही घटना घडल्या आहेत की, ज्यामुळे भरदिवसा देखील फिरणे अवघड झाले आहे. ही भटकी कुत्री एवढी निर्ढावली आहेत की, सरळ सोसायटींच्या आवारात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर दिवसाढवळ्या हल्ला करत आहेत.

ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत आहे, तर शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात तब्बल २३ हजार ३७४ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यानंतरही प्रशासन ठोस कारवाई करत नाही. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“पुणे महापालिकेने २०२४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यात ३७ हजार ४८६ भटकी आणि मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. या कुत्र्यांना रेबीजचे लसीकरण करण्यात आले आहे”, अशी माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.